साखर कारखान्यांप्रमाणेच गुऱ्हाळघरांकडूनही उसाला मोठी मागणी

कोल्हापूर : यंदा उसाच्या कमतरतेमुळे साखर कारखान्यांप्रमाणेच गुऱ्हाळघरांकडून उसाची मोठी मागणी आहे. गुऱ्हाळघर चालक शेतकऱ्यांना एकरकमी पैसे देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचाही गुऱ्हाळघरांना ऊस पाठवण्याकडे कल वाढला आहे. एकीकडे साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्याकडून ‘खुशाली’च्या नावाखाली शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम सुरु आहे. या प्रश्नावर साखर कारखानेदेखील मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांकडून उसाला दिले जाणारे रोख पेमेंटमुळे शेतकरी गुऱ्हाळाला ऊस पाठवत आहेत. जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

गुऱ्हाळघर चालक उसाच्या एका टनाला ३,१०० रुपये दर देत आहेत. पंधरा दिवसांच्या आत उसाचे पूर्ण पेमेंट केले जाते. उसाचे वजनदेखील शेतकऱ्यांसमोर होते. त्यामुळे शेतकरी गुऱ्हाळाकडेच वळत आहेत. अनेक शेतकरी गुऱ्हाळघरांकडे ऊस पाठवत आहेत. कागल परिसरातील अनेक गुऱ्हाळघरे बारमाही चालतात. पावसाळ्यात कर्नाटकातून ऊस आणला जातो. गुऱ्हाळ मालक स्वतःचा ऊस शिल्लक ठेवून बाहेरील ऊस गाळप करतात. कारखान्यांकडून कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा पाळीप्रमाणे ऊस नेण्यास विलंब होत असल्याने छोटे शेतकरी गुऱ्हाळघरांकडे वळत आहेत. ऊस तोडणी मजूर, टोळ्या शेतकऱ्यांची खुशालीसाठी अडवणूक करत आहेत असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here