पुणे : राजेगाव (ता. दौंड) परिसरातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या ऊस लागवडीला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजूर पारंपरिक पद्धतीने प्रतीकात्मक वाघाची मनोभावे पूजा करून लागवडीस प्रारंभ करीत आहेत. ऊस लागवड केलेल्या शेतात उसाच्या हिरव्या वाढ्यांचा वाघ करून तो वाघ शेतातील कटावर लावला जातो. नंतर त्या वाघाची श्रीफळ वाढवून पाणी, गुलाल, उदबत्ती, फुले, धनं (कोथिंबीर बी) इत्यादी पूजेचे साहित्य वापरून पूजा केली जाते. पूर्वी ऊस लागवड केली म्हणजे ‘वाघाचे काम’ (मोठे काम) केले असे समजले जायचे. पूर्वी ऊस चोरांपासून किंवा कोल्ह्यापासून संरक्षण होण्यासाठी प्रतिकात्मक वाघाची पूजा केली जाते. अशी त्यामागे धारणा असल्याचे सांगितले जाते.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नदी किनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेडीं, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाणी मिळत असल्याने शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. प्रतीकात्मक वाघाची ७ विधिवत पूजा करण्याची खूप दिवसांची वाडवडिलांची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. वाघाची पूजा केल्याने काळ्या आईची सेवा करायला दहा हत्तीचे बळ मिळते, असे ऊस लागवड टोळी मुकादम बाळासाहेब नांदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.