हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लखनऊ: चीनी मंडी
वाढत्या ऊस बिल थकबाकीमुळं पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचा मार्ग खडतर केला आहे. ऊस थकबाकी हा लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असून, भाजपला त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशचा विचार केला तर, प्रामुख्याने हा जाट समाजाचे वर्चस्व असणारा प्रदेश आहे. भाजपला २०१४ची लोकसभा आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या प्रदेशाच धवल यश मिळाले आहे. मुस्लिम मते फुटल्याने आणि शेतकऱ्यांची मते पूर्णपणे भाजपच्या पारड्यात पडल्याने भाजपला येथे चांगले यश मिळाले. पण, ऊस बिल थकबाकीने या प्रदेशातील राजकीय चित्र बदलले आहे. १२ मार्च अखेर ऊस बिल थकबाकी ११ हजार ८४५ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे संप, आंदोलने झाली असून, कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने ही आंदोलने जाट समाजातील शेतकऱ्यांनी केली असून, ते उघडपणे भाजप नेत्यांवर टिका करू लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील आठ जागांसाठी मतदान होणार आहे. येत्या ११ एप्रिलला तेथे मतदान होणार असून, मुजफ्फरनगर, सहारणपूर, कैराना, बिजनौर, मेरठ, बाघपत, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर या मोठ्या जागांसाठी मतदान होणार आहे. २०१४मध्ये या सगळ्या जागांवर भाजपने विजय मिळावला होता. यात भाजपला विजयी मार्जिनही चांगले मिळाले होते. सध्या महागटबंधनमध्ये असलेल्या राजकीय पक्षांच्या मतांची बेरीजही भाजपच्या मतांपेक्षा कमी होत होती. मुजप्फरनगरमध्ये भाजपच्या संजीव बलयान यांना ६ लाख ५३ हजार ३९१ मते मिळाली तर, विरोधी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला १ लाख ६० हजार ८१० आणि बसपच्या उमेदवाराला २ लाख ५२ हजार २४१ मते मिळाली. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा जाट बहूल मतदारा संघांवर वर्चस्व मिळवायला हवे. भाजपने दलितांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव मिळवला आहे. त्यात प्रामुख्याने वाल्मिकी आणि खाटिग समाजला आपल्याकडे वळवले आहे. बसपकडे केवळ जटवा समाज असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे ओबीसींमधील कश्यप आमि सैनी यांची मतेही भाजपच्या बाजूने आहेत.
दरम्यान, यंदाची निवडणूक दोन मुद्द्या्ंवर वेगळी ठरत आहेत. त्यात पहिला मुद्दा जाट समाजाचा आहे. जो संख्येने जास्त असून, पूर्णपणे सत्ताधारी भाजपच्या विरोधात गेला आहे. सरकार उत्तर प्रदेशात उसाची स्टेट अडव्हायजरी प्राइस देण्यात अपयशी ठरले आहे. यंदाचेच नव्हे, सलग दोन वर्षे ही स्थिती आहे. त्यामुळे भाजपला धोका आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि बसपने महागटबंधन करून मुस्लिम मते फुटणार नाहीत. याची काळजी घेतली आहे. त्यामुळे भाजपची वाट आणखी खडतर झाली आहे.
जातीची गणिते
कैराना मतदार संघाचा विचार केला तर, एकूण १५.५ लाख मतदारांपैकी ५ लाख २६ हजार मुस्लिम, तीन लाख दलित, एक लाख ४० हजार जाट, १.२५ लाख गुज्जर, १.३२ लाख काश्यप, १.३५ लाख सैनी, ६० हजार ब्राह्मण आणि ६० हजार वैश्य मतदार आहेत. येथे मुस्लिम, दलित (प्रामुख्याने जाटवा), जाट या मतांमुळे महागटबंधन भक्कम झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये रोष
एकेकाळी भाजपचा कट्टर कार्यकर्ता असलेला देशपाल राणा आजा. शामलीमध्ये उप्पर देओब साखर कारखान्यात किसान संघर्ष समितीचे नेतृत्व करतो. गेल्या दोन वर्षांतील परिस्थितीबाबत तो म्हणाला, ‘गेल्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनीच भाजपला मतदान केले होते. भाजपच्या किसान मोर्चाचा मी जिल्हाध्यक्ष होतो. आम्ही सगळ्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. पण, गेल्या दोन वर्षांत उसाच्या स्टेट अडव्हायजरी प्राइसमध्ये सरकारने एक रुपयाही वाढवला नाही. शेतकऱ्या एक क्विंटल ऊस पिकवायला २९७ रुपये खर्च येतो. तर, स्टेट अडव्हायजरी प्राइस ३२५ रुपये मिळते. जर, भाजप स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याविषयी इतके गंभीर असते. तर त्यांनी ४५० रुपये प्रति क्विंटल दर दिला असता. पण, सध्या आम्हाला आश्वासन देण्यात आलेले पैसेही दिले जात नाहीत.’
भाजप शेतकऱ्यालाही जाती आणि धर्मामध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे. बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लष्करी कथांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे, असे मत कालू राम शर्मा या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला कोणी मूर्ख समजण्याचा प्रयत्न करत असतील तर, ते स्वतः मुर्ख आहेत. आम्ही त्यांना गेल्या निवडणुकीत निर्विवाद पाठिंबा दिला आणि आमची अवस्था काय झाली पाहा. मुलांच्या शाळेची फी भरायला आमच्याकडे पैसे नाहीत. सावकाराकडे जमिनी गहाण ठेवून आम्ही पैसे उभे केले. हे सरकार आम्ही हद्दपार करू.’
कैराना मतदारसंघात २०१८च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या तिकिटावर तबस्सूम हसन यांनी विजय मिळवला होता. मतदारांचा मूड काय आहे, याची ती एक झलक होती. या मतदारसंघात तबस्सूम हसन यंदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर भाजप माजी खासदार हुकूम सिंह यांची कन्या मृगंका सिंह यांना तिकिट देणार आहे. भाजपच्य स्थानिक नेत्यांना अजूनही पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा आपल्याला फायदा होईल, अशी आशा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते अजय संगल मोदींच्या विजयाविषयी खात्री बाळगून आहेत. शामली येथे १७मार्च रोजी भाजप आमदार संगीत सोम यांची सभा झाली होती. त्यात सोम यांनी ‘भारतीय हवाई दल लाहोरमध्ये आपला झेंडा रोवण्यापासून काही मिनिटे दूर होते,’ असे वक्तव्य केले. संगल यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम उत्तर प्रदेशात या वक्तव्याने भाजपला स्फूरण चढले आहे. केवळ जाट समाज ऊस बिलावरून भाजपविरोधात उभा आहे. तो निवडणुकीचा मुद्दा नाही, असे मत संगल यांनी व्यक्त केले आहे.