कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील गारदे रान, चांभार खडी, शिवराम दरा, रोंगे दरा या परिसरात गव्यांच्या कळपाचे वास्तव्य आहे. त्यांनी या भागातील मका व ऊस फस्त केला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सुमारे १८ गवे या भागात असल्याने काही गावात भितीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात गव्यांनी शाळू, ज्वारीचे पिक फस्त केले होते. काही शेतकऱ्यांना केवळ वैरणीवरच समाधान मानावे लागले होते. आता दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत गव्यांचा कळप शेतात ऊस व मका खाण्यासाठी येतो. गव्यांच्या भीतीने काही शेतकरी रात्रीच्या वेळी रानात जात नाहीत. पोहाळे तर्फ आळते परिसरात पाण्याचे तलाव तसेच ऊस व मका शेती आहे. त्यामुळे गव्यांनी हा परिसर सोडलेला नाही. गव्यांनी ऊस व मका पिकाचे नुकसान केले आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.