कोल्हापूर : ज्याचा वशिला, त्याच्या उसाला तत्काळ तोड, अशी स्थिती झाल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष करत कर्नाटकातील ऊस गाळपासाठी खुलेआम आणण्याचा सपाटा लावला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस दोन-दोन दिवसांनी कारखान्यात उतरतो. त्यामुळे ऊस लागवड सोपी, पण घालवणे अवघड अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. अनेक ठिकाणी उत्पादकांनीच कोयता घेऊन मालक तोडणी सुरू केली आहे.
मजुरांना ३५० आणि जेवणखाण देऊनसुद्धा गतीने ऊस तोडणी होत नसल्याची स्थिती आहे. आता साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करून तीन महिने उलटून गेले आहेत; मात्र कारखान्यांचा तोडणी कार्यक्रमाचे वेळापत्रक काही जमले नाही. फेब्रुवारी महिना निम्मा संपला तरी शेती सेंटर कार्यालयात नोव्हेंबरचाच तोडणी कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कार्यालय, कर्मचारी यांच्याकडे हेलपाटे घालून शेतकरी वैतागले आहेत. सर्वसामान्य शेतकरी मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे.