कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेजारील सांगली आणि कर्नाटक राज्यातील कारखाने सुरू झाले आहेत. आता शेट्टी यांच्याकडे आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील या दोघांची चर्चा सुरू आहे. याप्रश्नी लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजू शेट्टी मागील हंगामातील ४०० रुपये द्या म्हणत आहेत. मात्र कारखानदारांना ते देणे शक्य नाही. सध्या काही कारखान्यांवर किमतीएवढे कर्ज झाले आहे. राज्यात कुठेही एकरकमी एफआरपी नाही; मात्र आपला जिल्हा एकरकमी पैसे देतो. त्यासाठीही कर्ज काढावे लागते. त्याची देणी वाढत आहेत. त्यामुळे नाहक व्याजाचा भुर्दंड पडत आहे. साखरेला जादा भाव मिळतो; मात्र जिल्ह्यातील कारखाने कमी दर असतानाही भीतीपोटी साखर विकतात, असे त्यांनी सांगितले.
मंत्री मु्श्रीफ यांनी सांगितले की, राजू शेट्टींसारखे नेते शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यासारखे नेते आहेत म्हणून साखर कारखानदार वळणावर आहेत. त्यांच्या आंदोलनाबाबत मला काही म्हणायचे नाही. मात्र त्यांनी चर्चा करावी तोडगा काढावा. सध्याची परिस्थिती पाहावी. जिल्ह्यातील दोन कारखाने आता बंदच होणार आहेत. इतरही त्याच वाटेवर जातील.