सांगली : येथील दत्ता इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन ३६ तासानंतर मागे घेण्यात आले. वसंतदादा साखर कारखान्याने ‘स्वाभिमानी’च्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कारखान्यासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याची घोषणा केली आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या ऊस दरापोटी एफआरपी अधिक १०० रुपये आणि गेल्या हंगामातील ५० व १०० रुपये प्रती टन दर द्यावा अशी मागणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यास मान्यता दिली आहे. त्याच पॅटर्ननुसार दर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनीही द्यावा अशी मागणी संघटनेने केली होती. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी त्यास नकार दिला होता. स्वाभिमानी संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून कारखान्याच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर दत्त इंडिया कारखान्याने संघटनेच्या मागणीप्रमाणे आम्ही दर देण्यात तयार असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे ३६ तास सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.