चंडीगढ : राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत असे हरियाणाचे कृषी मंत्री जे. पी. दलाल यांनी सांगितले. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि शेतकऱ्यांना आर्थिक रुपात अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही दलाल म्हणाले.
मंत्री दलाल यांनी आपल्या निवासस्थानी आलेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. ऊस दरात वाढ आणि विजेच्या दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांबाबत चर्चा करताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांची चर्चा करण्यासाठी आमची दारे सदैव खुली आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताची अजिबात फिकिर नाही अशी टीकाही मंत्री दलाल यांनी केली. त्यामुळे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काम करीत आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिदे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.