नंदुरबार : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील आयान शुगर प्रा. लि. (ता.नंदुरबार), शहादा तालुक्यातील सातपुडा व नवापुरातील आदिवासी सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. आयान कारखान्याचे गाळप सातपुडा कारखान्यापेक्षा १७ हजार मेट्रिक टनांनी अधिक आहे. खानदेशात एकूण दीड लाख मेट्रिक टनांपर्यंत ऊस गाळप झाल्याची माहिती मिळाली आहे. आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतीटन 2,345 रुपये भाव जाहीर केला आहे. कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, 21 रोजी करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी.बडगुजर उपस्थित होते. गेल्यावर्षी देखील कारखान्याने सर्वाधिक भाव दिल्याचे बडगुजर यांनी सांगून यंदाही ही परंपरा कायम राखत 2,345 रुपये भाव जाहीर केला. गेल्या हंगामापेक्षा यंदाचा ऊस दर हा 165 रुपये जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या गाळप हंगामात 4.50 लाख टन ऊस गाळप केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदापासून कारखान्याने शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी ई-स्मार्ट शुगर ऊस तोडणी, वजनकाटा व्यवस्थापन या अत्याधुनिक स्वयंचलित प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक सचिन शिनगारे, अतुल क्षिरसागर, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.