निपाणी : न भूतो न भविष्यती अशा महापुरामुळे बेळगावसह कोल्हापूर, सांगली या साखरपट्ट्यातील ऊस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस पाण्यात गेल्यामुळे पुढील महिन्यात सुरु होणार्या गळीत हंगामात कारखान्यांना ऊसाचा तुटवडा जाणवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे.
महापुरामुळे ऊस पिकाबरोबरच हजारो संसार उघड्यावर पडले. लाखो कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली. या अतिवृष्टीनंतर पावसाने दिलेली उघडीप याचाही फटका ऊस पिकाला बसला आहे. पुरासोबत वाहून आलेली माती ऊसाच्या पानांवर राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून ऊस करपला असल्याचे दिसत आहे. परिणामी उपलब्ध ऊस पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
ऊसाचे उत्पादन घटल्यामुळे ऊस उत्पादकांना अच्छे दिन येणार आहेत. कारखानदारांना ऊस उत्पादकांच्या पायघड्या घातल्याशिवाय गत्यंतर नाही असेच चित्र आहे. शिवाय येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकीत बहुतांशी साखर कारखानदार हे उमेदवार असण्याची शक्यता असल्याने ऊस उत्पादकांना खुश करण्याचा प्रयत्न वाढीव दराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. याचा फायदा सीमा भागातील उत्पादकांनाही होणार आहे.
कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांसह बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील नदीकाठावरील हजारो एकरातील ऊस पीक पुरामुळे पाण्याखाली गेले होते. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी येणार्या हंगामात कारखाने लवकर सुरु करुन पाण्याखाली गेलेला ऊस गाळपास घेवून जाण्याची सोय करावी, अशी मागणी कृष्णा काठावरील शेतकर्यांनी केली आहे. पुरामुळे ऊसाबरोबरच भाजीपाला, केळी अशा पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळेच राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर सुरु करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात चिकोडी, कागवाड, अथणी, रायबाग आणि निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते. दरवर्षी गळीत हंगामात ऊसाचे गाळप करुन कोट्यवधींची उलाढाल होते. पण यंदा महापुरामुळे ऊसपीक जवळपास उध्वस्तच झाले आहे. आठ ते दहा दिवस पुराचे पाणी पिकात राहिल्याने ऊसाचे शेंडे वाळून गेले आहेत. यासाठी राज्य शासनाने सर्वच साखर कारखाने लवकर सुरु करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी होत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.