नांदेड : नांदेड विभागात सध्या गाळप हंगाम गतीने सुरु झाला आहे. मात्र पावसाची दडी आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे विभागात ऊस उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लातूर आणि परभणी जिल्ह्यात उसाच्या वजनात सर्वाधिक घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत चालू गाळप हंगामात एक कोटी १२ लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तालयाकडे व्यक्त केला होता.
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ४६ लाख टन ऊस उपलब्ध आहे. तर परभणी जिल्ह्यात ३१ लाख टन, नांदेड जिल्ह्यात २४ लाख टन आणि हिंगोली जिल्ह्यात १३ लाख टन उसाचे गाळप होईल, अशी शक्यता प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कळविले होते. मात्र, गेल्या अडीच महिन्यापासून अनेक ठिकाणी उसावर रसशोषण करणाऱ्या किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे उसाच्या वाढीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.