लखनौ / पुणे / कोल्हापूर : देशात यंदा ३१३७ लाख टन उसाचे गाळप झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस गाळपात १७९ लाख टनांची घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे. उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत उसाच्या गाळपात घट झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या गाळपावरही झाला. सद्यस्थितीत अतिरिक्त ऊस असल्याने तमिळनाडूत तीन कारखाने अजूनही ऊस गाळप करत आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये ऊस गाळप घटले असले तरी महाराष्ट्र मात्र १६ लाख टनांनी ऊस गाळप वाढले आहे. उत्तर प्रदेशात उसावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साखर कारखाने आणि राज्य शासन किडीला आवर घालण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहेत.
यंदा उत्तर प्रदेशात गाळप मोठ्या प्रमाणावर घटले आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये १,०९१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ९७७ लाख टन उसाचे गाळप झाले. कर्नाटकात गेल्यावर्षी ५८० लाख टनांचे गाळप झाले होते. ते यंदा ५६५ लाख टनांवर आले. गुजरातमध्येही उसाचे गाळप ९५ लाख टनावरून ८९ लाख टनांवर आले आहे. आंध्र प्रदेशातही दोन लाख टनांची घट दिसून आली आहे. यंदा निव्वळ साखरेचे उत्पादन देखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनाने कमी राहण्याचे अनुमान आहे. यंदा देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त २१ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी वळवले जाईल असा अंदाज आहे.