साओ पाउलो : ब्राझीलच्या मध्य-दक्षिण भागात २०२५-२६ मध्ये उसाचे गाळप ५९३.२ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ते ३.२ टक्क्यांनी कमी असेल. प्रतिकूल हवामान आणि आगीमुळे प्रमुख उत्पादक प्रदेशावर परिणाम झाला आहे, असे स्टोनएक्स कन्सल्टन्सीने शुक्रवारी सांगितले. स्टोनएक्सच्या मते, ब्राझीलच्या मुख्य साखर उत्पादक प्रदेशात उसाच्या गाळपातील घटीचा हा दुसरा सलग हंगाम असेल. आधीच्या हंगामात विक्रमी ६.३ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
स्टोनएक्सने एका अहवालात म्हटले आहे की, “२०२५-२६ साठी सुरुवातीची शक्यता अद्याप अनिश्चित आहे. ऑक्टोबरपासून पावसाची नितांत गरज आहे, कारण नोव्हेंबर २०२३ पासून या प्रदेशात तीव्र पाणीटंचाई आहे. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर पुरवठादार आणि निर्यात व्यापारात ७० टक्के वाटा असलेला देश अनेक भागात ऐतिहासिक दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे उसासारख्या पिकांवर परिणाम होत आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, देशभरात वणव्याला लागलेल्या आगीमुळे उत्पादकांना आणखी चिंता वाटू लागली आहे.