सांगली : राज्यात गळीत हंगामासाठी साखर कारखाने सज्ज होत आहेत. सद्यस्थितीत उपलब्ध आकडेवारीनुसार, सांगली जिल्ह्यात जवळपास १ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. मात्र, नदीकाठच्या ऊसशेतीला पुराचा फटका बसल्याने एकरी ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. एकरी किमान दहा टक्के ऊस उत्पादन घटेल असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील कारखान्यांकडे तब्बल एक कोटी टनांहून अधिक टन ऊस गाळपास उपलब्ध असेल. पुरामुळे १५ लाख टन ऊस उत्पादन घटल्याचे सांगण्यात येते. गाळप हंगाम कधी सुरु होणार याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी साखर कारखान्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.
गेल्यावर्षी, सन २०२३ – २४ च्या हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरमधील ऊस उपलब्ध होता. आधीच्या वर्षापेक्षा उसाची लागवड १५ हजार हेक्टरने वाढली होती. तर आता, २०२४- २०२५ या हंगामासाठी एक लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगामी, सुरू खोडवा मिळून एकूण जिल्ह्यात सर्वाधिक ऊसक्षेत्र वाळवा तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ मिरज, खानापूर तालुक्यात ऊस लागवड आहे. गेल्यावर्षी एकूण १, ४४, १२७ हेक्टर क्षेत्र ऊस मागील हंगामासाठी उपलब्ध होता. तर यंदा १ लाख ३७ हजार हेक्टरमध्ये ऊस गाळपासाठी तयार आहे. गळीत हंगामासाठी साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, जत युनिट, विश्वास, हुतात्मा, सोनहिरा क्रांती, दालमिया, सांगली दत्त इंडिया, तासगाव, श्री श्री राजेवाडी, आरग, उदगिरी, नागेवाडी, श्रीपती शुगर्स आदी कारखाने सज्ज होऊ लागले आहेत. इतर कारखान्यांमध्ये हालचाली सुरू आहेत.