ऊस टंचाई : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बहुतांश साखर कारखाने मार्चमध्येच बंद होण्याची शक्यता
पुणे / कोल्हापूर : चालू गाळप हंगामात (२०२४-२५), देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उसाच्या तुटवड्यामुळे बहुतांश साखर कारखाने मार्चमध्येच बंद होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांना गेल्या काही दिवसापासून उसाची कमतरता भासत आहे.बरेलीतील साखर कारखान्यांना उसाअभावी गाळप मध्येच बंद करावे लागत आहे. अशीच स्थिती अन्य काही जिल्ह्यात ही पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमधील काही साखर कारखान्यांनी अप्रत्यक्षपणे ४०० रुपये प्रती क्विंटल दराने ऊस खरेदी सुरू केली आहे. त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लाल सड रोगामुळे ऊस उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे येत्या काळात उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये उसाच्या किमतीचे युद्ध सुरू होऊ शकते. तथापि, राज्य सरकारने चालू गळीत हंगामासाठी उसाची राज्य सल्लागार किंमत (एसएपी) अद्याप निश्चित केलेली नाही. राज्यातील साखर कारखाने सध्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामाचा प्रति क्विंटल ३७० रुपये एसएपी देत आहेत. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऊस पिकाची वाढ खुंटली आहे आणि तेथे फुलोऱ्याची अवस्था आली आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता आणि त्यातील साखरेच्या रिकव्हरीवर परिणाम होत आहे.
यंदा पश्चिम उत्तर प्रदेशात उसाचे उत्पादन सुमारे १५ ते २० टक्यांनी घटले आहे. शिवाय, साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली आहे. बरेली ते शामलीपर्यंत ऊस पिकाची परिस्थिती एकसारखीच आहे. उसाच्या कमतरतेमुळे येत्या काळात उसासाठी प्रति क्विंटल ४०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागू शकतो. यावर्षी रोगामुळे उसाची उत्पादकता २० टक्क्यांनी घटली आहे. शामलीतील साखर कारखाना वगळता, जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखाने मार्चमध्येच बंद होतील. कारण ऊस कमी आहे. शामली कारखाना उशिरा सुरू झाला. त्यामुळे तो एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातही बहुतांश साखर कारखाने मार्चच्या मध्यापर्यंत गाळप थांबवतील. महाराष्ट्र, कर्नाटकातील ऊस पिक अकाली फुलांच्या अवस्थेत पोहोचले आहे. या परिस्थितीत, पिकाची वाढ थांबली तर त्यातील शुक्रोजचे प्रमाणदेखील कमी होते आणि उसाचे वजन कमी होते.नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने चालू गाळप हंगामासाठी (२०२४-२५) साखर उत्पादनाचा अंदाज २७० लाख टनांपर्यंत कमी केला आहे. गेल्यावर्षी साखरेचे उत्पादन ३१९ लाख टन झाले होते. गेल्या हंगामाच्या अखेरीस ८० लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. तर चालू वर्षात साखरेचा वापर २९५ लाख टन असण्याचा अंदाज आहे. सरकारने अलीकडेच १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. अशा स्थितीत, चालू हंगामाच्या अखेरीस, देशात सुमारे ४५ लाख टन साखरेचा साठा असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फेडरेशनच्या मते, चालू हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ११०.२० लाख टनांवरून ८६ लाख टनांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तर उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीच्या १०३.६५ लाख टनांवरून ९३ लाख टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. कर्नाटकातील साखर उत्पादन गेल्या हंगामातील ५३ लाख टनांवरून ४१ लाख टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. महिन्यापूर्वी, फेडरेशनने साखर उत्पादन २८० लाख टन होण्याचा अंदाज वर्तवला होता, त्यावेळी उत्तर प्रदेशात ९८ लाख टन आणि महाराष्ट्रात ८७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता.
महाराष्ट्रात पीक लवकर फुलांच्या अवस्थेत येण्याचे कारण २०२३-२४ मध्ये दीर्घकाळ दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी असल्याचे मानले जाते. याचा अर्थ हवामानातील बदलाचा ऊस पिकावर परिणाम झाला आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील सर्वात लोकप्रिय उसाच्या को ०२३८ जातीमध्ये, रेड रॉट आणि टॉप शूट बोअरर रोग हे उत्पादकतेत घट होण्याचे प्रमुख कारण आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने चालू गाळप हंगामासाठी (२०२४-२५) राज्य सल्लागार किंमत (एसएपी) अद्याप निश्चित केलेली नाही. बहुतांश भागातील गाळप संपले आहे आणि नोव्हेंबर २०२४ पासून गाळप सुरू केलेल्या कारखान्यांचे गाळप मार्चमध्येच समाप्त होईल. गेल्या हंगामासाठी (२०२३-२४), राज्यातील लवकर पिकणाऱ्या उसाच्या जातीसाठी प्रती क्विंटल ३७० रुपये एसएपी निश्चित करण्यात आला होता. परंतु यावर्षी अद्याप ‘एसएपी’चा निर्णय झालेला नाही. त्यामुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना मागील हंगामाचा ‘एसएपी’ देत आहेत. त्याचवेळी, पंजाबमध्ये देशात सर्वाधिक ४०१ रुपये प्रति क्विंटल ‘एसएपी’ आहे आणि शेजारील राज्य हरियाणामध्ये चालू हंगामासाठी ४०० रुपये प्रति क्विंटल एएसएपी आहे.
सध्याच्या परिस्थितीत, सरकारने शेतकऱ्यांसाठी उच्च ‘एसएपी’ जाहीर केली नसली तरी, साखर कारखान्यांमधील ऊस उपलब्धतेसाठीची स्पर्धा आणि गूळ, ऊस उद्योगातील स्पर्धा यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्याच्या एसएपीपेक्षा जास्त भाव मिळत आहेत. हा दर गाळप हंगामाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मिळू शकतो.