मुंबई : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधील ऊस गाळपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चालू हंगामात राज्यातील साखर उत्पादन अनुमानापेक्षा कमी होणार आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होईल. राज्यातील २१० साखर कारखान्यांपैकी फक्त ५५ कारखाने गाळप करीत आहेत. गाळप बंद केलेल्या काही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, गाळप हंगाम समाप्तीच्या मार्गावर असला तरी महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी दिलेली नाही असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. शेट्टी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची थकबाकी जवळपास दोन महिने उशीरा मिळत आहे. तर साखर कारखाने अधिकाधिक इथेनॉल उत्पादन करुन नफा मिळवत आहेत. कायद्यानुसार ऊस गाळप केल्यानंतर १५ दिवसांत एफआरपी देणे अनिवार्य आहे. तर महाराष्ट्राच्या साखर आयुक्त कार्यालयाने सांगितले की ९२ टक्के एफआरपी देण्यात आली आहे. केवळ ८ टक्के बिले थकीत आहेत. चालू हंगामात आतापर्यंत १०४ लाख टन ऊस गाळप झाले आहे.
महाराष्ट्रात देशाच्या एकूण साखर उत्पादनाच्या एक तृतीयांश उत्पादन होते. राज्यात २०२२-२३ मध्ये १०७ ते १०८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे. पूर्वी जाहीर केलेल्या १२८ लाख टनाच्या पुर्वानुमानाच्या तुलनेत हे उत्पादन खूप कमी असेल. २६ मार्चअखेर १०३.८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या वर्षी समान कालावधीपर्यंत ११६ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा गाळप सुरू केलेल्या २१० कारखान्यांपैकी १५५ कारखान्यांनी २६ मार्चपर्यंत गाळप बंद केले आहे. २०२१-२२ मध्ये उच्चांकी १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. पुढील पंधरा दिवसात ५ ते ६ लाख टन साखर उत्पादन होईल अशी शक्यता आहे. यंदा केंद्र सरकारने केवळ ६१ लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली. साखर उद्योगाला आणखी २० लाख टन अतिरिक्त निर्यात परवानगीची अपेक्षा होती. मात्र, महाराष्ट्रातील साखर उत्पादनातील घसरणीमुळे अतिरिक्त निर्यात होण्याची शक्यता धुसर झाली आहे.