धाराशिव : साखर आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात ऊस गाळपात रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगरने अव्वल स्थान पटकावले आहे. तर उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील क्वीनर्जी इंडस्ट्रिजने द्वितीय आणि परंडा-भूम तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या ईडा जवळा येथील आयन मल्टीट्रेड कारखान्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात सुरू आहे. सर्वच कारखान्याचा गळीत हंगामाचा एक ते दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडून ८६८८१७ मे. टन गाळप आतापर्यंत झाले आहे.
जिल्ह्यात एकूण १२ साखर कारखान्यांकडून ८ लाख ६८ हजार ८१७ मे. टन ऊसाचे गाळप करून ५ लाख ८५ हजार ६८१ क्विंटल साखर उत्पादीत करण्यात आली. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ६.७४ टक्के आहे. जिल्ह्यातील ५ सहकारी साखर कारखान्यांनी एकूण ३ लाख ७३ हजार ६०१ मे. टन ऊस गाळप करून २ लाख ७६ हजार १०० क्विंटल साखर (उतारा ७.३९ टक्के) उत्पादीत केली. जिल्ह्यातील ७ खाजगी साखर कारखान्यांनी ४ लाख ९५ हजार २१६ मे. टन ऊस गाळप करून ३ लाख ९ हजार ५८१ क्विंटल साखर (उतारा ६.२५) उत्पादीत केली आहे. ढोकी (ता. धाराशिव) येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाकडून चालवला जात असून तेरणा कारखान्याने अद्याप ३८ हजार २९५ मे. टन उसाचे गाळप केले. २७९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याने ६७ हजार ९० मे. टन ऊसाचे गाळप तर ६४ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने अद्यापपर्यंत ८१ हजार ५०० मे. टन ऊसाचे गाळप करून ६२ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली.