बागपत : शेतांमध्ये तोडणी अभावी उभा असलेल्या ३० लाख क्विंटल उसाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. प्रचंड उष्णतेमुळे ऊस तोडणी कामगार मिळत नसल्याचे चित्र आहे. जे कामगार उपलब्ध होत आहेत, त्यांना दुप्पट मजुरी द्यावी लागत आहे. याशिवाय साखर कारखाने बंद होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बागपतमधील ऊस परिसरातील १२ साखर कारखान्यांकडून खरेदी केला जातो. आतापर्यंत ३.६० कोटी क्विंटल ऊस साखर कारखान्यांनी खरेदी केला आहे. तरीही हजारो शेतकऱ्यांचा ३० लाख क्विंटल ऊस अद्याप शेतातच आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बंद झाले आहेत. मात्र, बागपतमधील तीन साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. १५ ते २० मेपर्यंत बागपतमधील तिन्ही साखर कारखाने बंद होऊ शकतात. जर त्यानंतर ऊस शेतात शिल्लक राहिला तर काय करायचे याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. ऊस तोडणीसाठी आधी प्रती क्विंटल २० रुपये जादा द्यावे लागत आहेत. पूर्वी ऊस तोडणीसाठी प्रती क्विंटल ३० ते ४० रुपये मजुरी द्यावी लागत होती. आता ४० ते ५० रुपये प्रती क्विंटल मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत.
दरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. संपूर्ण ऊस गाळप झाल्यावरच बागपतमधील तिन्ही साखर कारखाने बंद केले जातील.