शामली : जलालपूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विभागीय स्तरावर आयोजित कार्यशाळेत ऊस पिकावर पसरलेल्या किड, रोगांविषयी चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना रोग तसेच किडीच्या नियंत्रणाबाबत जागृती करण्यावर भर देण्यात आला. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्रा होते. सध्या ऊस पिकावर टॉप बोरर रोगाचा अधिक फैलाव झाला आहे. त्यामुळे उसाच्या रोपाचा वरील भाग नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता ब्लॅक बगचा प्रसार झाल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागातील ज्या गावांमध्ये रोगाचा अधिक फैलाव झाला आहे, अशा ठिकाणी जिल्हा ऊस अधिकारी आणि संबंधित साखर कारखान्यांच्या ऊस विभागाच्या महासंचालकांनी भेट द्यावी. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना पिकाचा किड, रोगापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्याची सूचना उपायुक्त डॉ. मिश्रा यांनी केली. कृषी संशोधक डॉ. विकास मलिक यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून किड, रोगांवर कसे नियंत्रण मिळवता येईल याबाबत सादरीकरण केले. या कार्यशाळेला शामलीचे जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह, मुजफ्फरनगरचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, कृषी शास्त्रज्ञ डॉ. ओंकार सिंह आणि मुजफ्फरनगर, सहारनपूर, शामली जिल्ह्यातील सर्व आठ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.