सांगली : राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमांना एक टक्के दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. वाढत्या महागाईमुळे ऊस वाहतूकदारांना सध्याच्या दरात साखर कारखान्यांना ऊस पाठविणे आर्थिक अडचणीचे बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ पंधरा दिवसांत करावी, अन्यथा संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.येत्या आठ दिवसांत माजी खासदार राजू शेट्टी व पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय ऊस वाहतकदारांचा मेळावा घेण्याचे ठरले आहे.
यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा म्हणाले, राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ केल्यामळे प्रतिटन ३६६ रुपये झाले आहेत. त्याचबरोबर मुकादमास १ टक्के कमिशनमध्ये वाढ झाल्याने प्रतिटन ७३ रुपये मिळणार आहेत. असे असताना वाढती महागाई, डिझेल, वाहन दुरुस्ती, ऑईल, टायर्स खर्च, मजुरांना द्यावा लागणार जास्तीचा अॅडव्हान्स व त्यावरील व्याज, दुरुस्तीचा खर्च यासह महागाईमुळे वाहतकदार अडचणीत आले आहेत. यावेळी नागेश मोहिते, विठ्ठल पाटील, विनोद पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.