सिंधुदुर्ग : खराब असलेल्या तळेरे-गगनबावडा महामार्गामुळे ऊस वाहतुकीत अडथळे येणार आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने करूळ ते नाधवडे अशी पदयात्रा काढली. तब्बल १७ किलोमीटरच्या या पदयात्रेत बैलगाडी घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, नीलम पालव, अनंत पिळणकर, विशाल जाधव, मंगेश लोके यांच्यासह ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. तळेरे-गगनबावडा महामार्गाचे काम तातडीने हाती घ्यावे, रस्ते दुरुस्ती दर्जेदार करावी, शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यावर नेण्यायोग्य रस्ता करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचे दर्जेदार काम एप्रिलपूर्वी पूर्ण व्हायला हवे. पदयात्रा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. परंतु त्यानंतर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. संभाजी चौकातील पदयात्रेवेळी खासदार राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांमुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचे परिणाम ऊस उत्पादक शेतकरी, वाहनचालकांना भोगावे लागत असल्याचे ते म्हणाले.