पुणे : साखर कारखाने सुरू झाल्यानंतर रस्त्यावर ऊस वाहतूक वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत यासाठी सर्व साखर कारखान्यांना बारामती आरटीओ कार्यालयाने पत्र दिले आहे. साखर कारखान्यांनी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूकदारांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी, असे या पत्राद्वारे बजावण्यात आले आहे.
याबाबत बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले की, ऊस वाहतूक करताना झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. यामुळे साखर कारखान्यांनी रस्ता सुरक्षिततेच्या नियमांची माहिती वाहनचालकांना व्हावी यासाठी पुढाकार घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सहकार्य करावे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे ही सामूहिक जबाबदारी स्वीकारून सहकार्य करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस परावर्तक (रिप्लेक्टीव्ह रेडियम) दिसून येत नाहीत, वाहतूक करीत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नाही, क्षमतेपेक्षाजास्त उसाची वाहतूक, वाहनांची कागदपत्र वैध नसतात, कर्कश्य आवाजामध्ये संगीत लावले जाते, विनानोंदणी ट्रॅक्टर व ट्रेलर दिसून येतात. नोंदणी क्रमांक प्रदर्शित केल्याची ही दिसून येत नाही असे ‘आरटीओ’च्या निदर्शनास आले आहे.