पुणे : जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांची कोंडी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने फोडली आहे. कारखाना वहातूकदारांची संघटना नीलकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार संघटनेने कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी केली होती. याबाबत सोमवारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ६ ते ५० किलोमीटर दरम्यानच्या ऊस वाहतुकीला २५ रुपये प्रतिटन अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे म्हणाले की, यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने उसाची कमतरता होती, तरीही वाहतूकदारांनी शर्थीचे प्रयत्न करून माळेगाव कारखान्यास ऊस पुरवठा करण्यास प्राधान्य दिले. ऊस वाहतूकदारांना दोन पैसे जादा मिळावेत यासाठी कारखाना प्रशासनाला निवेदने दिली होती. नीलकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटना व कारखाना प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा केली. आता कारखाना प्रशासनाने अनुदान रुपात दर दिला आहे. बैठकीस कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवबापू जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, संचालक बन्सीलाल आटोळे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, उपाध्यक्ष सागर तावरे, संजय खलाटे, बापूराव देवकाते, नितीन चोपडे, सचिन मोटे, गणेश जगताप, प्रवीण देवकाते, सुनीलकाका गावडे आदी उपस्थित होते.