नाशिक : यंदा पाऊस घटल्याने ऊस उत्पादनात घट झाली आहे. परिणामी साखर कारखान्यांना याचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. मागणीच्या तुलनेत ऊस कमी असल्याने कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील पश्चिम पट्ट्याच्या तुलनेत जिल्ह्यात उसाचे फारसे क्षेत्र नाही. मात्र, दिवाळी जवळ आल्याने कारखान्यांनी गाळपाचे उद्दिष्ट जाहीर करत हंगामाची तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील उसाच्या एकूण क्षेत्रापैकी बराचसा ऊस नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरविला जातो. निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र घटले आहे. याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. परिणामी, सर्व कारखान्यांनी कमी गाळप उद्दिष्ट जाहीर केले आहे. एफआरपी इतका आणि त्यावर दर देण्याची तयारी कारखान्यांनी केली आहे.
जिल्ह्यात नाशिक-पळसे येथील नाशिक साखर कारखाना नऊ वर्षानंतर सुरू होत आहे. कारखान्याचे गाळप उद्दिष्ट २.५० लाख टन ठेवण्यात आले आहे. दिंडोरीच्या कादवा सहकारी साखर कारखान्याचाही बॉयलर पेटला आहे. निफाड कारखाना सुरू होण्याची चिन्हे नाहीत. रानवड कारखाना सुरू होणार असून त्याची क्षमता प्रतीदिन १२०० टन आहे. कादवा कारखान्याची क्षमता ७५ हजार टन आहे. बागलाणमधील द्वारकाधीश साखर कारखानाही सुरू होत आहे. यंदा नगर जिल्ह्यातील कारखानेही ऊस खरेदीच्या स्पर्धेत उतरतील असे चित्र आहे.