कोल्हापूर : गेली दोन वर्षे कारखाने नफ्यात आले आहेत. साखरेसह उपपदार्थांना जादा दर मिळूनही साखर कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत नाहीत. नफ्यातील वाटा म्हणून गत हंगामातील दुसरा हप्ता ५०० रुपये आणि चालू हंगामात प्रति टन ३,५०० रुपये दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला. शिरोळ येथे ऊस दर प्रश्नावर आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर नव्याने सुरू केलेल्या शेतकरी वजन काट्याचे उद्घाटन व एल्गार परिषद झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी रघुनाथ पाटील होते.
धनाजी चुडमुंगे म्हणाले की, आंदोलन अंकुशने ऊसदराच्या प्रश्नांवर लढा सुरू केला आहे. साखर कारखान्यांनी २०१७ पासून शेतकऱ्यांना फक्त एफआरपी दिली; मात्र यामध्ये शेतीमध्ये घातलेला खर्चही भागत नाही. कारखान्यांना झालेल्या फायद्यातून ५०० रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांचा तोटा काही प्रमाणात भरून निघेल. कर्नाटकमधील कारखान्यांमुळे या भागातील कारखान्यांनी ३००१ रुपये दर जाहीर केला. पण शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारल्या नाहीत. कारखान्यांनी दुसरा हप्ता देऊन कोंडी फोडावी. यावेळी वजन काट्याचे उद्घाटन खोनमीर बुखारी इनामदार यांच्या हस्ते झाले. अमोल गावडे, अक्षय पाटील, दिगंबर सकट, उदय होगले, दीपक पाटील, कृष्णात देशमुख, बी. जी. पाटील, राजू पवार, साक्षी बाबर आदींची भाषणे झाली. राकेश जगदाळे, विजयकुमार दिवाण, संभाजी शिंदे, सर्जेराव पाटील, आप्पासो कदम, भूषण गंगावणे आदी उपस्थित होते.