पुणे : बारामती तालुक्यात यंदा तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या भागातील बागायती पट्टाही या वर्षी होरपळला आहे. सर्वत्र उष्णता वाढल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. आताच पारा ३८ अंशांवर गेल्याने उकाडा वाढला आहे. सहकारी कारखान्याची ऊसतोडणी अजूनही सुरू आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा ऊसतोडणी मजुरांना फटका बसत आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात तापमान सरासरी ३८ अंशांवर जात आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे. पुढील दीड महिना कसा जाणार, याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. तर ऊस तोडणी सुरू असलेल्या ठिकाणी बिकट स्थिती आहे. ऊस तोडणी मजूर उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. पहाटे ऊसतोडणी सुरुवात केल्यानंतर भर दुपारी उन्हात ऊस वाहतूक करावी लागते. कडक उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी ऊस वाहतूक बैलगाडीवर छत बनवून सावली तयार केली जात आहे. तर उन्हापासून शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी मेंढपाळही दुपारी झाडाचा आधार घेत आहेत.