बीड: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील साखर कारखाने 15 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यातील पाच ते सहा लाख ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होणार आहे. यातील मतदारांना मतदानासाठी आणण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. कारखान्यावर जाणाऱ्या मजुरांना कारखाना सुरू होण्यापूर्वी राहण्यासाठी कोप्या, जनावरांची व्यवस्था, आदी कामे करावी लागतात.
मजुरांना १० नोव्हेंबर पर्यंत कारखान्यावर पोहोचावे लागणार आहे. १५ तारखेला कारखान्यात ऊस पोच करण्याचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील बहुतांश ऊसतोड मजुरांना कारखान्यावर पोहोचावे लागणार आहे. राज्यभरातील सुमारे १२ ते १५ लाख ऊसतोड मजूर आहेत. लोकनेते गोपीनाथरावजी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप म्हणाले कि, राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबरला साखर कारखान्यांचे गळीत सुरू होणार आहे. आम्ही कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी बांधील आहोत. आम्हाला मजुरांना घेऊन जावेच लागणार आहे. मतदानासाठीचे नियोजन अद्याप झालेले नाही.