बीड : बीडची उसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकण्याची गरज आहे. आपल्या मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी ऊस तोड मजुरांनी त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तालुका विधी सेवा समिती केज व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने मस्साजोग येथे विधी सेवा प्राधिकरणाचे महाशिबिर झाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर होते.
जी. जी. सोनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक चेतना तिडके यांनी सायबर क्राईमबाबत सूचना केल्या. लोकांनी आपला ओटीपी कुणालाही शेअर करु नये तसेच फसवणुक झाल्यास त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी न्याय विभागाकडुन असे महामेळावे घेणे कौतुकास्पद असुन सर्वसामान्य नागरीकांना याचा लाभ मिळत आहे, असे सांगितले.