ऊस उत्पादक चिंताग्रस्त
कोल्हापूर, दि. 16 ऑगस्ट 2018 : शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. विशेषता उसासाठी आवश्यक असणाऱ्या खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने उसाच्या एकरी उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. सुपर फास्फेट, डी. ए. पी, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश या खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.
मार्च-एप्रिल 2018 पासून खतांच्या किमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ अजुन ही सुरु आहे. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेरिक अॅसिडची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढ झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्येक ख़त १० ते १२ टक्के महाग झाले आहे.
पावसाळ्यात उसाला डीएपी खत दिले जाते. या खाताच्या किमतीत एका बॅगमागे सुमारे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या वर्गवारीतील एनपीके खतांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यातील 10 :26:26 च्या एका बॅगच्या मार्चमधील 1060 ते 1070 रुपये असलेल्या किमती1186 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.या खातामध्ये 110 रुपयांची वाढ झाली आहे. 24:24:10 च्या किमतीतही 185 रुपयांनी आहेत. युरियाच्या किमती जैसे थे असल्या तरीही युरियाच्या पॅकिंगचे वजन कमी करण्यात आले आहे. पूर्वी 295 रुपयांना 50 किलोग्रॅमच्या पॅकिंगमध्ये येणारी युरियाची पिशवी आता 45 किलोची करण्यात आली असून, ती 265 ते 275 रुपयांना मिळत आहे. पोटॅश (एमओपी) वर्गातील खतांसह, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आदी विविध प्रकारच्या खतांचे दर वाढले आहेत.