शाहजहांपूर : बरेली परिक्षेत्राचे ऊस उपायुक्त राजीव राय यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत रोजा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बंथरा गावात सुरू असलेल्या ऊस सर्व्हेची पाहणी केली. २० जूनपर्यंत प्रत्येक गावातील सर्व्हे पूर्ण करावेत असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. उपायुक्तांसोबत जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव उपस्थित होते. यावेळी सर्व्हे टीममधील पर्यवेक्षक आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर जीपीएसद्वारे ऊस लागवडीच्या क्षेत्राची मोजणी केली. कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना जागेवरच उसाची स्लीप दिली.
दैनिक अमर उजालामधील वृत्तानुसार, डीसीओ डॉ. भार्गव म्हणाले की, जिल्ह्यात २.०७ लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सर्व्हे केला आहे. जिल्ह्यात १९३० ऊस ग्राम आहेत. आतापर्यंत १२५८ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या गावांमध्ये ४०,११८ हेक्टर लागण तर २८,१६७ हेक्टर खोडवा क्षेत्र आहे. एकूण ६८,२८५ हेक्टर उसाचा सर्व्हे झाला आहे. जिल्ह्यातील ७० टक्के क्षेत्राची पाहणी झाली आहे. यावेळी उपायुक्तांनी वीस जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यास सांगितले. सहकारी ऊस समितीचे सचिव मानवेंद्र त्रिपाठी, ऊस व्यवस्थापक सुरेंद्र सिंह मान व मनोज सिंह, शेतकरी सुबोध सिंह, नन्हे सिंह, सुंदर पाल सिंह, अवधेश सिंह, बलवीर सिंह, हरवीर सिंह, विभागीय पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.