सांगली : वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील एका ऊस तोडणी मजुराने ऊस तोडणीचा नवा उच्चांक निर्मण केला आहे. या तोडणी मजुराने एका दिवसात विक्रमी १६ टन ऊसाची तोडणी केली. विक्रमी ऊस तोडणी करणाऱ्या या कामगाराचे नाव ईश्वर रामचंद्र सांगोळकर आहे. ईश्वर यांनी ज्या दिवशी हा ऊस तोडणीचा विक्रम केला, त्या दिवशी फक्त दोन बिस्किटे आणि चहा घेतला होता हे विशेष. ईश्वरच्या या विक्रमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्याचे अभिनंदन केले आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तांनुसार कुंडलवाडीतील संजय फाटक यांनी वारणा साखर कारखान्याकडे ऊस पाठवण्यासाठी या हंगामात ट्रॅक्टर भाड्याने लावला आहे. या ट्रॅक्टरवर जत तालुक्यताली ऊस तोडणी करणारी टोळी कार्यरत आहे. या ऊस तोडणी कामगारांत ईश्वर सांगोळकरचाही समावेश आहे. खरेतर एक तोडणी कामगार दिवसाला २ टन ऊस तोडू शकतो. मात्र, ईश्वर यांनी एका दिवसात १६ टन ऊसाची तोडणी केली. अशोक सावंत यांच्या शेतात त्यांनी हा ऊस तोडणीचा विक्रम केला.