कोल्हापूर : आजरा साखर कारखाना २०१० पासून आर्थिक अडचणीत आहे. येत्या हंगामात ४ लाख टन उसाचे गाळप झाले, तरच कारखान्याचे चाक रुळावर येईल. त्यासाठी शेतकरी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंत धुरे यांनी केले. गवसे येथील कारखाना कार्यस्थळी ३४ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कारखान्याची कर्जाची मर्यादाही संपल्यामुळे उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच आधुनिकीकरण केले आहे. ‘एफआरपी’ व्यतिरिक्त थकीत अनामत रकमेच्या बिनव्याजी ठेव पावत्या तातडीने दिल्या जातील. हंगामानंतर सभासदांना सवलतीची साखर देण्याचे आश्वासन अध्यक्ष धुरे यांनी दिले.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनावर घेतल्यामुळेच बंद पडलेला कारखाना सुरू झाला आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. दरम्यान, माजी अध्यक्ष सुनील शिंत्रे म्हणाले, गाळपात फरक पडणार नसल्यामुळे सध्या आधुनिकीकरण करायला नको होते. ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर म्हणाल्या, पेद्रेवाडीतील टोळ्यांचा करार सांगूनही करून घेतला नाही. पेद्रेवाडी कार्यक्षेत्रात आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला.
चर्चेत तानाजी देसाई, इंद्रजित देसाई, युवराज पोवार, रियाज तकिलदार, संजय देसाई, तुळसाप्पा पोवार आदींनी भाग घेतला. उपाध्यक्ष मधुकर देसाई यांनी स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी नोटीस वाचन केले. संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संचालक काशीनाथ तेली यांनी आभार मानले.