पुणे : निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वावर सभासदांची निष्ठा व सहकार्य गेल्या २६ वर्षांपासून कायम आहे. गत सन २०२३ – २४च्या हंगामात उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. पू्र्ण पक्व नसलेल्या उसाचे गाळप झाल्याने साखर उतारा कमी आला. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी मिळाले. परिणामी, कारखान्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र, सभासदांनी आगामी काळात कारखान्यास गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे. कारखान्याला गतवैभव निश्चितपणे प्राप्त करू, असा विश्वास कारखान्याचे संस्थापक तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. शहाजीनगर येथे निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, साखरेची एमएसपी व इथेनॉलच्या दरवाढीसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविकामध्ये कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी संस्था चालविताना अनेक अडचणी येत आहेत, तालुक्याच्या विकासासाठी भाऊंना साथ द्या, असे आवाहन केले. कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला.
प्र-कार्यकारी संचालक सुधीर गंगे पाटील यांनी अहवालवाचन केले. विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, अनिल पाटील, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, प्रसाद पाटील, चंद्रकांत भोसले, राजकुमार जाधव, तानाजी नाईक, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, मोहन गुळवे, सुरेश मेहेर, विक्रम कोरटकर उपस्थित होते. उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी आभार मानले.