इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखरेच्या तुटवड्याच्या वृत्ताचे खंडन करताना वाणिज्य मंत्री नवीद कमर यांनी बुधवारी नॅशनल असेंब्लीमध्ये सांगितले की, सरकारने एप्रिल २०२२ पासून जानेवारी २०२३ यादरम्यान कोणत्याही प्रकारे साखर आयात केलेली नाही. मात्र, याच कालावधीत खासगी क्षेत्रांकडून ५,८२७ मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती. ते म्हणाले की, देशात साखरेचा अजिबात तुटवडा नाही. कारण, आपल्याकडे अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. यादरम्यान, अर्थ राज्यमंत्री आयशा गौस पाशा यांनी आधीच्या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत (आयएमएफ) वचनांची पूर्तता केली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.
अर्थ आणि महसूल मंत्री इशार दार यांनी सांगितले की, सध्याच्या सरकारला एक अशी अर्थव्यवस्था मिळाली आहे की जी आर्थिक संकट, महागाईचा दबाव, वाढत्या अर्थपोषणाची गरज, चलनाचा दर, बाहेरील दबाव आणि ऊर्जा संकट अशा आव्हानांनी घेरली गेली आहे. ते म्हणाले की, FY२२ मध्ये, व्यापार तूट ३९.७ बिलियन डॉलर आणि चालू खात्यातील तुट (CAD) जवळपास १७.४ बिलियन डॉलर होता. वित्तीय तूट जीडीपीच्या ७.९ टक्के होती. उच्च व्यापार तूट/CAD आणि बाह्य परतफेडीच्या दबावामुळे, SBP परकीय चलनाचा साठा कमी होत गेला.