हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बरेली : चीनीमंडी
बिजुआ येथील गुलरिया साखर कारखान्याकडून आता सॅटेलाइटच्या मदतीने उसाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे सॅटेलाइटद्वारे उसाचा सर्व्हे करण्याचा प्रयोग कारखान्याकडून होत असल्याचा दावा कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. याबाबत केरळ येथील एका कंपनीच्या संचालकांनी याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकही दाखवले.
गुलरिया साखर कारखान्याने केरळ येथील जियो ट्रान्स टेक्नॉलॉजी या कंपनीशी याबाबत करार केला आहे. सर्व्हे सुरू करण्यासाठी आवश्यक हँड मशीन येथे आणण्यात आली आहे. ही सेवा देणाऱ्या कंपनीचे संचालक सुदीप केवी यांनी या तंत्राचे खिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक दाखवले. गुलरियामध्ये सुदीप केवी म्हणाले की या प्रयोगातून सर्व्हे करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. जिथे उसावर किडीचे आक्रमण झाले आहे अथवा ऊस पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडला आहे अशी ठिकाणी शोधण्यासही याचा वापर होणार आहे.
साखर कारखान्याचे व्यवस्थापक (ऊस) सुरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, देशात पहिल्यांदाच या टेक्नॉलॉजीचा वापर गुलरिया कारखान्यात होत आहे. यामुळे सर्व्हेमध्ये होणाऱ्या गोंधळ दूर होईल. आणि खऱ्या ऊस क्षेत्राची माहिती कारखान्याला मिळेल. यावेळी कारखान्याचे ऊस अधिकारी राजेंद्र त्यागी, गिरीजेश सिंह, आयटी हेड राजीव सिन्हा, उप व्यवस्थापक व्ही. के. सिंह, प्रविण शर्मा आदी उपस्थित होते.