सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उसाला पहिली उचल एफआरपी अधिक शंभर रुपये मिळावी, या मागणीसाठी राजारामबापू साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ऊस दराबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रविवारी, दि. १० डिसेंबर रोजी महामार्ग रोखणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात ठरल्यानुसार मागील वर्षाचे १०० रुपये आणि चालू वर्षाचे एफआरपी अधिक १०० रुपये असा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदार स्वीकारतील, असे वाटले होते. सांगलीतील कारखानदारांनी मागील १०० रुपये देण्याचे मान्य केले. मात्र पहिली उचल सरसकट ३१०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन करावे लागले. जिल्हा प्रशासनाने कारखानदारांची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. मात्र दुर्लक्ष केले गेले आहे. जिल्हाधिकारी केवळ आश्वासन देत आहेत. त्यामुळे आमचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केल्यानुसार रविवारी महामार्ग रोखण्याचे आंदोलन केले जाईल.