कोल्हापूर : मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला अतिरिक्त 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. हेरवाड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखरेने भरलेला कंटेनर अडवले. आंदोलकांनी एका कंटेनरची हवा सोडून साखरेच्या पोत्यांवर पाणी ओतले. आक्रमक कार्यकर्त्यांनी कंटेनर चालकाला मारहाण केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संतप्त कार्यकर्त्यांनी सर्व १८ कंटेनर कारखान्याकडे परत पाठवले. कर्नाटकातील बेडकिहाळ (ता. चिक्कोडी) येथील श्री वेंकटेश्वरा साखर कारखान्याच्या साखरेची ही वाहतूक सुरू होती.
बेडकिहाळ येथील श्री व्यंकटेश्वरा सहकारी साखर कारखान्याची साखर १८ कंटेनरमधून विक्रीसाठी जाणार होती. कंटेनर हेरवाड येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अडवले. मात्र, कंटेनरचालकाने त्यात मैद्याची पोती आहेत, असे खोटे सांगितले. कार्यकर्त्यांना कंटेनरमध्ये साखरेची पोती आढळल्यावर त्यांनी चालकास मारहाण केली. एका कंटेनरच्या चाकातील हवा सोडून साखरेची पाच पोती खाली टाकली. त्यावर पाणी ओतले. संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालिघाटे, सुवर्णा अफराज, बंडू पाटील, अविनाश गुदले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.