सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (22 नोव्हेंबर) मसूर येथे मसूर – कराड रोडवर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखत ऊस दरासाठी आंदोलन केले. कारखाना व्यवस्थापनाने गेल्या हंगामातील ४०० रुपये, चालू हंगामातील ऊसाला ३,५०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे सह्याद्री कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी शेकडो वाहने अडकून पडली. कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
‘स्वाभिमानी’च्या या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दर जाहीर करावा, अन्यथा वाहतूक सुरू करू देणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत कोणताही तोडगा निघाला नव्हता. वाहतूक अडवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.यावेळी ‘स्वाभिमानी’ने साखर कारखान्याच्यावतीने ऊस वाहतूक बंद करावी, दर जाहीर झाल्यानंतर, तोडगा निघाल्यानंतरच ऊस वाहतूक, तोड केली जाईल असे लेखी द्यावे, त्यानंतरच अडवलेली वाहने सोडण्यात येतील असा पवित्र घेतला. जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले की, जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.