सातारा : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ‘स्वाभिमानी’ने फलटण तालुक्यातील साखरवाडीतील श्री दत्त इंडिया शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावर मोर्चा काढला. गेल्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता व यंदाच्या हंगामासाठी दर जाहीर न केल्यास ऊसतोड करणार नाही, श्री दत्त इंडिया कारखान्यास ऊस घालणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या प्रश्नी श्री दत्त इंडिया कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जगताप यांना निवेदन देण्यात आले.
साखरवाडी ग्रामपंचायतीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. कारखान्याने गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचे अंतिम बिल प्रती टन ३,४११ रुपयांप्रमाणे दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून दिवाळी गोड करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन यादव, दादा जाधव, रवींद्र घाडगे, प्रमोद गाडे, सचिन खानविलकर, शकिल शेख, किरण भोसले, नीलेश भोसले, राजेंद्र धनसिंग भोसले, दादा गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.