सांगली : वारणा नदी काठावरील जिल्ह्यातील बागणी परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी ऊस तोडणी बंद पाडली. मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रोखून धरले. यावेळी ‘स्वाभिमानी’चे आनंदराव शेटे, भास्कर शेटे, संभाजी चौगले, रयत क्रांतीचे आनंदराव डाळे, नासिर नायकवडी आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामाचे ४०० रुपये आणि यावर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडल्याशिवाय कोणीही तोडणी सुरू करू नये यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यानुसार बागणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक आनंदराव शेटे यांच्या नेतृत्वाखाली तोडी बंद पाडल्या.
यावेळी आनंदराव शेटे म्हणाले, शेतकऱ्यांनी घामाचे दाम मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी तोडीसाठी घाई गडबड करू नये. दर जाहीर होईपर्यंत आपल्या उसाला तोड घेऊ नये. ज्या ट्रॅक्टर मालकांनी ऊस तोडणी सुरू केली आहे, त्यांनीही आंदोलनाला पाठिंबा देऊन तोडी थांबवाव्यात. ट्रॅक्टर मालकसुद्धा शेतकरीच आहेत, त्यांची फसवणूक होत असताना त्यांच्यासाठीसुद्धा संघर्ष ‘स्वाभिमानी’नेच केला आहे. शेतकरी हितासाठी त्यांनीही आम्हाला साथ द्यावी.