परभणी : जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांच्या मंगरूळ (ता. मानवत ) पाटीवरील विभागीय कार्यालयांना संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी ११ वाजता टाळे ठोकून ऊस वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चोखट यांच्या नेतृत्वात ऊसतोडीची वाहने अडविण्यात आली. तसेच कारखान्यांच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन सुरू आंदोलन केले.
मानवत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचा सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन शुगर व परभणी तालुक्यातील आमडापूर येथील लक्ष्मी नृसिंह शुगर्स या दोन कारखान्यांना ऊस तोडून नेला जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचीच्या ऊस तोडीस टाळाटाळ केली जात आहे. दोन तासांच्या आंदोलनानंतर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन दिवसांत ऊसतोड सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष दत्तराव परांडे, ज्ञानोबा चोखट, बाळासाहेब चोखट, गोविंद जाधव आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.