सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला वाढीव दर द्यावा, सभासद शेतकऱ्याचा ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे आदी मागण्या करत राजेवाडी येथील सद्गुरू कारखाना चार तास बंद पाडला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. आंदोलकांनी गव्हाणीकडे जाणारी उसाची वाहने रोखल्याने तीन ते चार तास वाहतूक थांबवली. कारखाना प्रशासनाचे अधिकारी उदय जाधव यांनी १०० रुपये वाढीचे पत्र प्रशासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जाहीर केले.
आंदोलनावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त कार्यकर्ते गेट मोडून गव्हाणीच्या दिशेने धाव घेतली. आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणीसाठी अग्रक्रम द्यावा, राजेवाडी परिसरात प्रदूषित पाणी सोडले जाते, त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्या करण्यात आले. आजपासून गळीत होणाऱ्या उसाला वाढीव १०० रुपये, तर यापूर्वी गाळप झालेल्या उसाला वाढीव ५० रुपये देण्याचे प्रशासनाने कबूल करून तसे लेखी पत्र दिले असे खराडे म्हणाले. आटपाडी तालुका अध्यक्ष विजय माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, मनसेचे प्रकाश गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, अजित बोरकर, अजित कोडग, शहाजन शेख, ईश्वर माने, तानाजी सागर, नंदकुमार माने, केशव शिरकांदे, कृष्णा पुजारी, राजेंद्र पाटील, बाबुराव शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.