सोनहिरा कारखान्यावर ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्तासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ढोल-ताशा आंदोलन केले. ‘एफआरपी’नंतरचा प्रति टन ४०० रुपयांचा हप्ता जमा करावा, अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, भरत इनामदार, रामदास महिंद, राजू माने, इम्रान पटेल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महागाईमुळे औषधे, खते, बी-बियाणे कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोंडावर दसरा, दिवाळी सण असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याने तातडीने दुसरा हप्ता चारशे रुपये खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संदीप राजोबा म्हणाले की, गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा एफआरपीनंतरचा दुसरा हप्ता चार रुपये दोन ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी केली होती. साखर कारखान्यांना गेल्या वर्षभरात साखर, उपपदार्थास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना चांगला नफा मिळाला आहे. तरीही कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्यांना तातडीने पैसे जमा न केल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करू. यावेळी बाळासाहेब जाधव, बाळासो शिंदे, धन्यकुमार पाटील, प्रताप पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here