कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यावर ढोल बजावो आंदोलन केले. साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील दुसरा हप्ता म्हणून प्रती टन ४०० रुपये द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हे आंदोलन केले.
संघटनेने शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांसमोर हे आंदोलन केले आहे. यावेळी सावकर मादनाईक म्हणाले की, साखर कारखान्यांना गेल्या वर्षभरात साखरेला व उप-पदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. आता शेतऱ्यांकडे दसरा आणि दिवाळी सण जवळ आला असताना सणासुदीला पैसे नाहीत. कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता ४०० रुपये खात्यावर जमा करावा.
संघटनेने सर्व साखर कारखान्यांना २ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ढोल ताशा आंदोलनाच्या माध्यमातून कारखान्यांना जागे केले जात आहे असे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे उपस्थित होते.