बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
कोल्हापूर : चीनी मंडी
थकीत एफआरपीच्या बदल्यात साखर घेतली तर ती विकायची कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे शेतकरी एफआरपीच्या बदल्यात साखर घेण्यास फारसे उत्सुक नाहीत. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखान्यांकडून थकीत एफआरपीच्या बदल्यात साखर घेण्यावर ठाम आहे. संघटनेने पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिरोळ येथे खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
संघटनेचे म्हणणे आहे की, कारखान्यांनी २९ रुपये किलो या दराने उच्च प्रतिची साखर द्यावी. त्यावरचा जीएसटी शेतकरी भरणार नाहीत. त्यामुळे कारखान्यांनीच साखर कशी देणार हे जाहीर करावे. नाशिक आणि नगर जिल्ह्यांत ११ साखर कारखान्यांनी एफआरपी जमा केली आहे. पण, सांगली, कोल्हापुरातील कारखाने साखर का देत नाहीत, असा प्रश्न सावकर मादनाईक यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी साखर कुठे विकायची यावर, आमच्याकडे व्यापारी आहेत. आम्ही त्यांना साखर विकू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रति टन १६ ते १७ किलो साखर मिळणार आहे. ती विकण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही केव्हाही साखर घेण्यास तयार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच थकीत एफआरपीचे व्याज देण्याची तरतूदही कायद्यात आहे. हे व्याज आम्ही मानगुटीवर बसून वसूल करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
ऊस परिषदेनंतर झालेल्या बैठकीत पहिली उचल २९०० रुपये त्यानंतर २०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शवली होती. पण, आता पर्यंत काही कारखान्यांनी पूर्ण एफआरपी थकवली आहे. तर काहींनी केवळ २३०० रुपये जमा केले आहेत. त्याला संघटनेचा आक्षेप आहे. जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी वेगवेगळी आहे. पण, पहिला हप्ता २३०० रुपये सर्वच कारखाने कसा जमा करतात, असा प्रश्न संघटनेने केला आहे. प्रत्येक घरात सोसायट्यांमार्फत साखर पोहोच करावी, असा पर्यायही संघटनेने सूचवला आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp