स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा फुट, रविकांत तुपकर यांनी मांडला सवता सुभा!

कोल्हापूर:स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता पुन्हा एकदा फुट पडली आहे.उल्हास पाटील, सदाभाऊ खोत, आमदार देवेंद्र भुयार यांच्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी संघटनेशी फारकत घेत सवता सुभा मांडला आहे.गेल्या काही महिन्यापासून संघटना आणि तुपकर यांच्यात संघर्ष सुरु होता.अखेर या संघर्षाची परिणीती संघटना फुटीत झाली.स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतलेल्यापैकी सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.उल्हास पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर आता तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी पक्षाची स्थापना केली.

तुपकर यांच्याकडून ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ची घोषणा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आजपासून आमचा आणि रविकांत तुपकर यांचा काहीच संबंध नसल्याचे जाहीर केले. तपकर यांनी ट्वीट करत आपल्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती.आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही धक्कादायक असल्याचे तुपकर म्हणाले होते. यानंतर रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांची बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ या नव्या पक्षाची घोषणा केली.तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.

राजू शेट्टी यांच्यासमोर संघटनेची मोट बांधण्याचे आव्हान…

संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. संघटनेतील सहकारीही सोडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेची मोट बांधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला. यावेळी तर ते अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.त्यापाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होतील.त्यापूर्वी संघटनेची भक्कम बांधणी करून संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात विस्तार करण्याचे मोठे आव्हान शेट्टी यांच्यासमोर आहे .

शेतकरी संघटनेला फुटीचे ग्रहण…

ऊस दराचा मुद्दा मांडत राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेतून बाहेर पडत शरद जोशी यांच्यासमोर आव्हान उभे करून स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा राजू शेट्टींचा राजकीय प्रवास आहे. ते एक वेळा आमदार व दोन वेळा खासदार झाले. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत संघटनेच्या माध्यमातून आमदार व राज्यमंत्री झाले. तेथून फुटून गेल्यावर ते पुन्हा आमदार झाले. तर रविकांत तुपकर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष झाले. आता ते संघटनेतून बाहेर पडले आहेत. शेट्टी यांनी २०१४ साली भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यातून त्यांच्या संघटनेला विधान परिषदेची एक जागा मिळाली. राज्यमंत्रिपदही आले.सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. या काळात संघटनेला यंत्रमाग महामंडळाचे राज्यस्तरीय अध्यक्षपद मिळाले.तेथे रविकांत तुपकर यांना संधी मिळाली; मात्र तुपकर व शेट्टी यांचे जमले नाही.आता शेट्टी यांना आगामी काळात संघटना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here