नाशिक: देशात आयात शुल्क न लावता मका मागविण्यास परवानगी द्यावी यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. मात्र ही मागणी चुकीची आहे. येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मक्का बाजारात येईल. त्यामुळे मका आयात केला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडेल. केंद्र सरकारने असा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येवू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत शेट्टी यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवले आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, यावर्षीचा मान्सून चांगला असल्याने शेतकऱ्यांना मक्याचे अधिक उत्पादन मिळेल. महिन्याभरात खरीप हंगामातील मक्का बाजारात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मका आयात करण्याची गरज नाही. आयात केल्यास मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. केंद्राने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत, मका कमी किमतीत विकला जातो. त्याची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आयात शुल्काशिवाय मका आयात केल्यास देशात मक्याच्या किमती आणखी घसरतील आणि महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना फटका बसेल. सध्याच्या स्थितीत मका आयात करण्याची गरज नाही. पोल्ट्री उत्पादकांच्या दबावामुळे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.