लाखो ऊस उत्पादकांच्या न्यायासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 26 जून रोजी काढणार कैफियत यात्रा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुध्दी मिळावी,शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द व्हावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी राजर्षी शाहू महाराज यांचे ‘जनकस्थळ ते समाधिस्थळ’ अशी कैफियत यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जू रोजी होणा-या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीदिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतक-यांची कैफियत मोर्चा काढण्यात येणार आहे.राजर्षी शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीमुळे शेतक-यांच्या जीवनात क्रांती आली.शेतक-यांसाठी त्यांनी धरणे बांधली, शेतीवर आधारित उद्योगधंदे कोल्हापुरात सुरू केले.समाजातील सामान्य घटकापर्यंत त्यांनी आपले कार्य पोहचविले त्याच कार्याचा आदर्श घेऊन सरकार काम करत असल्याचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी व कारखानदार बोलतात.मात्र त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे छत्रपती शाहू महाराज यांच्या २६ जू रोजी होणा-या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (१५० व्या)जयंतीदिवशी शेतक-यांची १५० मुलांना सोबत घेऊन आम्ही कागल ‘जनकस्थळ ते कोल्हापूर समाधिस्थळ’ असा कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतक-यांची कैफियत मोर्चा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा २६ जून रोजी सकाळी ८ वाजता कागल येथील गैबी चौक येथून सुरवात होवून राष्ट्रीय महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ, सायबर कॅालेज, शाहू मिल, पार्वती टॅाकीज, गोकुळ हॅाटेल, दसरा चौक ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ अशी असणार आहे.

‘चीनीमंडी’शी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि,जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या आणि लोकराज्य निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो ऊस उत्पादक आणि नियोजित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठीच या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्याचे काम केले जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी म्हणाले कि,26 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता कागल येथील गैबी चौकातून यात्रेला प्रारंभ होईल आणि यात्रेची सांगता शाहू महाराज स्मृतीस्थळ,कोल्हापूर येथे होणार आहे.

कैफियत यात्रेची जय्यत तयारी सुरु…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कैफियत जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यातील गावागावात ‘स्वभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे.या यात्रेत कोल्हापूरसह सीमाभागातील हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here