कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामातील २३ वी ऊस परिषद घेण्याची घोषणा केली आहे. ही ऊस परिषद २५ ऑक्टोंबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार आहे. गत हंगामातील उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रतिटन दोनशे रूपये देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पैसे दिले नाहीत तर कारखान्यांचे धुराडी पेटवू देणार नाही, असाही इशारा शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न तिसऱ्या आघाडीने चालवले आहेत. या आघाडीचे नेते, माजी खासदार शेट्टी यांनी राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी शेट्टी यांनी कंबर कसत राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
ऊस परिषदेतून शेट्टी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील असे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निर्माण केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना शह देण्यासाठीच आघाडीची निर्मिती केल्याचे मत नेत्यांचे आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता आघाडीने सत्ताधाऱ्यांसह प्रमुख विरोधक असणाऱ्या मविआला घेरले आहे. ऊस परिषदेतून शेट्टी सत्ताधारी महायुतीला घेरणार की मविआवर हल्लाबोल करणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.