कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. थकीत हप्ता तातडीने देण्यात यावा, या मागणीवरून आक्रमक झालेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगांव-हातकंणगले (जि. कोल्हापूर) रस्त्यावर काळे झेंडे दाखविले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. कारखानदारांना पाठीशी घालू नका, गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या, अशा आशयाचे फलक फडकावले.
ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर १०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून पुणे-बेंगलोर महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते. जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रूपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मात्र राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.